मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा   

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी शंतनू कुकडे प्रकरणात पोलिसांना बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे मानकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यातच त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्यामुळे शहराच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे.
 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा शंतनू कुकडे हा राज्याचा उपाध्यक्ष होता. महिलांच्या तक्रारीनंतर त्याला अत्याचारप्रकरणी समर्थ पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी शंतनू कुकडेची अधिक तपासणी केली असता त्याच्या बँक खात्यावरून शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी दीपक मानकर यांना काही दिवसांपूर्वी चौकशीला बोलावले होते. यावेळी दीपक मानकर यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता. तसेच, या संदर्भात दीपक मानकर यांनी काही कागदपत्र पोलिसांसमोर सादर केली.दरम्यान, पोलिसांनी मानकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता, ती कागदपत्र बनावट असल्याचे त्यांना आढळून आले.
 
आमच्यावर दबाव नाही : संदीपसिंह गिल
 
शंतनु कुकडे याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना, रेड हाऊस संस्था आणि कुकडे यांच्या बॅक खात्यावर आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. तपास कामासाठी दीपक मानकर यांना कागदपत्र सादर करायला सांगितली होती. रौनक जैन आणि दीपक मानकर यांच्याकडून एक बनावट कागदपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे मानकर, कुकडे, जैन यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात कोणाचा किती सहभाग आहे?, याची चौकशी सुरू आहे. आमच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही. त्यामुळे कायद्यानुसार कारवाई सुरू राहील.

Related Articles